आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवसात आगीच्या दोन घटना घडल्या. धानोरे फाटा येथील पगडे वस्तीवरील ग्रोवेल कंपनीला शनिवारी (दि.23) पावणे पाचच्या सुमारास आग लागली. तर दुसरी घटना चऱ्होली बुद्रुक येथे दाभाडे सरकार चौकासमोर दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये एका ट्रकला आग लागली. या आगीची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धानोरे फाटा येथील पगडे वस्तीवरील ग्रोवेल कंपनीला पावणे पाचच्या सुमारास आग लागली. याठिकाणी आगीची तीव्रता अधिक प्रमाणात होती. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तात्काळ अग्निशमन वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अगदी कमी वेळात आग आटोक्यात आणली. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले.
आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलातील फायरमन प्रसाद बोराटे, तुळशीराम कोळपे, विनायक सोळंकी, अक्षय त्रिभुवन यांनी उत्तम कामगिरी करत दोन्ही घटनांमध्ये आग विझविण्यात यश मिळविले. याबाबतची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.