पुणे : तडीपार आदेशाचा भंग करून शहरात वावरणाऱ्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी शनिवारी (दि. २३) अटक केली. चतुःशृंगी आणि बाणेर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश यमनाप्पा कुर्डेकरी (वय २६, रा. पांडवनगर, वडारवाडी) व गौरव संभाजी काकडे (रा. पाषाण) ही अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कुर्डेकरी व काकडे या दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. या आदेशाचा भंग करून कुर्डेकरी चतुःशृंगी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
दुसऱ्या एका कारवाईत बाणेर पोलिसांनी शहरातून तडीपार केलेला गुंड गौरव काकडे याला बेड्या ठोकल्या. काकडे याला मार्च महिन्यात शहरातून तडीपार करण्यात आले होते. या आदेशाचा भंग करून तो पुण्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.