पुणे : भारतीय डाक विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकिट प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे “पुणेपेक्स-२०२३” प्रदर्शन ७ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर पालिका, श्री. अर्जुन देवरे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी पुणे, श्री आर. पी गुप्ता प्रोफेसर ऑफ प्रक्टिस, गोखले इन्स्टिट्यूट, सुश्री सिमरन कौर, निर्देशक, डाक सेवा पुणे क्षेत्र हे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आर. के. जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र हे उपस्थित होते.
दरम्यान, ऐतिहासिक वास्तूवारसा लाभलेल्या वानवडी येथील ‘शिंदे छत्री’ व नानासाहेब सरपोतदार यांनी सन १९३५ मध्ये सुरु केलेल्या प्रसिद्ध “ पुना गेस्ट हाउस” वर विशेष आवरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. पुण्यातील वानवडी येथील शिंदे छत्री हे १८ व्या शतकातील मराठा लष्करी सरदार महादजी शिंदे यांना समर्पित स्मारक आहे. त्यांनी १७६० ते १७८० या काळात पेशव्यांच्या काळात मराठा सैन्याचे सरसेनापती म्हणून काम केले. हे शहरातील सर्वात लक्षणीय ठिकाणांपैकी एक आणि मराठा राजवटीची आठवण करून देणारे आहे.
यावेळी श्री यशवंत भोसले म्हणले की, राजे जोतिरादित्या शिंदे घराण्यामार्फत शिंदे छत्री व परीसराचे जीर्णोद्धार आणि नूतनीकरण करण्यात येत असून त्याद्वारे भावी पिढ्यांना आपला इतिहास व पराक्रम माहित होईल.
दिवंगत चित्रपट निर्माते नाना सरपोतदार यांनी त्यांच्या चित्रपट आणि स्टुडिओमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या जेवणाची पूर्तता करण्यासाठी १९३५ मध्ये पुना गेस्ट हाऊस सुरू केले. १९३६ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना राहण्यासाठी निवासाची सोयही सुरू केली. बाजीराव चिवडा आणि मस्तानी मिसळ सोबत खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ हे पूना गेस्ट हाऊसच्या मेनूमधील खास पदार्थ आहेत.
याप्रसंगी बोलताना, श्री. किशोर सरपोतदार, संचालक पुना गेस्ट हाउस यांनी सांगितले की, त्यांच्या घराण्याची चौथी पिढी पुना गेस्ट हाउस चालवत असून ते याकडे केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून बघत आले आहे. डाक विभागाने विशेष आवरण प्रकाशित करून त्यांचा गौरवच केला असून त्यामुळे त्यांची जबाबदारी अजून वाढली आहे. सुश्री सिमरन कौर, निदेशक डाक सेवा पुणे यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल पुणेकरांचे विशेष आभार मानले आणि यापुढे देखील फिलाटेलीस प्रोत्साहनाची ग्वाही दिली.
आपल्या अध्यक्षीय संबोधनात श्री आर. के. जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र यांनी मागील दोन दिवसांपासून सुरु असलेले विविध उपक्रम तसेच विजेत्यांचे कौतुक केले. तसेच दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनास पुणेकरांनी विशेषतः शाळेच्या जवळपास एक हजार मुलांनी भरघोस प्रतिसाद देवून आनंद उपभोगला हे नमूद केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक श्रेणीमध्ये प्रदर्शित केलेल्या उत्तम तिकीट संग्राहकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युवा श्रेणीमध्ये शौनक कुलकर्णी आणि एरो फिलाटेली या श्रेणीमध्ये श्री. विनीत वैद्य यांना विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रदर्शनाच्या आयोजनाकरिता इंटरनॅशनल कलेक्टर्स सोयायटी ऑफ रेअर आयटम्स यांनी विशेष सहकार्य केले. श्रीमती रिपन डूल्लेट, वरिष्ठ डाक अधीक्षक, पुणे शहर पश्चिम विभाग यांच्या यशस्वी आयोजनाचे सर्वानी विशेष कौतुक केले.