पुणे : जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १११६.८१ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिके, फळपिकांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. बाधितांना दोन कोटी १५ लाख १९ हजार ९४९ रुपयांची मदत दिली जाणार आहे.
जून महिन्यातील अतिवृष्टी, पुरामुळे शिरूर, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील १०० शेतकऱ्यांच्या ४२.५१ हेक्टर क्षेत्रावरीले शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याकरिता ११ लाख १८ हजार ६७० रुपयांची मदत केली जाणार आहे. जुलै महिन्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, हवेली, खेड आणि दौंड तालुक्यातील ३९४८ शेतकऱ्यांच्या १०७४.३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्याकरिता दोन कोटी चार लाख एक हजार २७९ रुपयांची मदत केली जाणार आहे. जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले एकूण क्षेत्र १११६.८१ हेक्टर असून, त्याकरिता दोन कोटी १५ लाख १९ हजार ९४९ रुपयांची मदत दिली जाणार आहे.