भोर : वरंधा घाट माथ्यावरील शिरगाव (ता. भोर) जवळील उंबर्डेवाडीत शेतकरी माळरानात दोन म्हशी व दोन रेडके चारीत असताना बिबट्याने अचानक एका रेडक्यावर हल्ला केला. याचवेळी शेजारी चरणाऱ्या दोन म्हशींनी बिबट्याला धडका देऊन पळवून लावल्याने रेडकाचे प्राण वाचले. मात्र, या हल्ल्यात रेडकू जखमी झाले आहे.
वरंधा घाट (ता. भोर) परिसरात मोठे जंगल असल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. वारंवार बिबटे वाहतुकीच्या रस्त्यावर तसेच शेतात शेतकऱ्यांना फिरताना दिसत असतात. वर्षभरात या परिसरात बिबट्याने हल्ला करून चार ते पाच जनावरे दगावली असल्याचे ताजे चित्र असतानाच उंबर्डे वाडी येथे शेतकरी रानात म्हशी चारत असताना जंगलात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक म्हशीच्या रेडक्यावर हल्ला चढविला. रेडक्याला बिबट्या ओढून घेऊन जात होता, तेवढ्यात चरणाऱ्या दोन म्हशींना रेडकू ओरडण्याचा आवाज आला. या वेळी शेतकरी व दोन्ही म्हशींनी रेडक्याच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. शेतकरी घाबरून गेले. मात्र दोन म्हशींनी रेडक्याला वाचवण्यासाठी बिबट्याला टक्कर देत दोन ते चार वेळा धडका दिल्या. बिबट्याने घाबरून रेडकू सोडून पळ काढला.