नारायणगाव : परिसरातील शेटे मळा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्याची नारायणगाव परिसरातील महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. पाळीव जनावरांबरोबरच मानवावर बिबट्या हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात प्रगतशील शेतकरी बाळासाहेब तोडकरी (वय-६५) व भंगार व्यावसायिक शर्मा (वय-३५) हे जखमी झाले आहेत. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब तोडकरी हे मोटर सायकल वरून नारायणवाडी रस्त्याने घरी चालले होते. शेटे मळा जवळील ओढ्या जवळ आले असता रस्त्याच्या कडेच्या उसात असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरी विकास तोडकरी, योगेश तोडकरी, धनंजय तोडकरी, संदीप पाटे, रोहन पाटे यांनी केली आहे.
दरम्यान, साडेआठच्या सुमारास याच रस्त्याने भंगार व्यावसायिक शर्मा हे मोटरसायकलवर जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाला व हाताला जखम झाली आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामीण रुग्णालयात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली.
नारायणगाव परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकऱ्यांचा जीव धोक्यात असताना वनविभागाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना वनरक्षक ज्ञानेश्वर पवार म्हणाले की, शेटे मळा परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचे वास्तव्य आहे. बछडे सोबत असताना मादी आक्रमक बनते. बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी ती मानवावर हल्ला करते.