इंदापूर : भिगवण (ता. इंदापूर, पुणे) येथील राशीन-भिगवण रस्त्याने पुण्याकडे जाणाऱ्या भिगवणमधील बाह्यवळणालगत, महावितरणच्या कार्यालयाजवळील जाधव वस्तीजवळ राशीन (ता. कर्जत) येथील मेडिकल चालवत असलेली एक व्यक्ती चारचाकी गाडीतून उतरली. त्यावेळी त्याच्यासोबत इतर दोन व्यक्ती होत्या. त्यांच्या मदतीने त्याने गाडीतून आणलेल्या दोन गोण्या औषधे रस्त्याच्या कडेला फेकून दिली. या मुदत बाह्य औषधांमुळे जनावरांची हानी होण्याची शक्यता होती. मात्र, पत्रकार आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे जनावरांची जिवितहानी टळली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ती औषधे २०२२ सालातील असून, वापरण्याची मुदत संपलेली आहे. ही औषधे सुमारे एक वर्षांपूर्वीची असून, रस्त्याच्या कडेला गवतावर आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी फेकून दिल्याने भीमा नदीच्या पात्रात जनावरे चरण्याच्या ठिकाणी गवतावर पडून ती जनावरांनी खाल्ल्यास जनावरांना तत्काळ विषबाधा होऊ शकते. यामुळे जनावरे मृत्युमुखी पडू शकतात, असे भिगवणचे आरोग्य अधिकारी विभुते यांनी सांगितले.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. भिगवण (ता. इंदापूर) पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांना याबाबत सांगितल्यावर संपूर्ण फोटो आणि व्हिडिओ पाहून चारचाकी गाडीच्या क्रमांकावरून भिगवणच्या पोलिसांनी तत्काळ औषधे फेकून देणाऱ्याचा शोध लावला. ही औषधे भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस सरडे यांनी वरिष्ठांच्या मदतीने पंचनामा करून जप्त केला.
भिगवण पोलीस स्टेशन येथे औषधे आणल्यावर लगेचच डॉ. विभुते तसेच भिगवण येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी औषधांची संख्या, संपलेली मुदत, जनावरांची औषधे किती आणि माणसांची औषधे किती, याचा साठा किती, ही माहिती गोळा केली. औषधाचा साठा रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या फेकून देणे हा माणसांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोकादायक आहे. संबंधित भिगवण पोलीस स्टेशन येथे पंचनामा, रिपोर्ट सादर करून पुढील कार्यवाहीसाठी दिला. यावर भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.