शिरूर (पुणे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करून लुटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व शिरूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शिरीष सोपान जाधव, (वय १९, रा. होलार आळी, शिरूर, ता. शिरूर) व संतोष मारूती ढोबळे, (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरूर ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरात रात्रीच्या वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांची जबरदस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यानुसार, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांना तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या घटनेचा पोलीस तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण याद्वारे माहिती मिळवली. तसेच एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, शिरूर शहरात राहणारे शिरीष जाधव व संतोष ढोबळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी शिरूर शहरात चार गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली.
दरम्यान, दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी ५२ हजार रुपयांचे ४ मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेल्या ४५ हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथासाहेब जगताप, रघुनाथ हाळनोर यांनी केली आहे. याप्रकरणाचा तपास शिरूर पोलीस करत आहेत.