लोणी काळभोर : सर्वोच्च न्यायालयाने दिवसा व रात्रीच्या वेळी डीजे, लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. असे असतानाही पूर्व हवेलीतील हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये गणेश आगमनाच्या दिवशी शासकीय नियम पायदळी तुडवून डीजे, बँड कर्णकर्कश आवाज वाढविल्याचा प्रकार शनिवारी (ता. ७) समोर आला आहे.
तर काही ठिकाणी डीजे वाजवण्यावरून अनेक सार्वजनिक मंडळांची ठस्सल लागल्याची पाहायला मिळाली आहे. मात्र, याकडे पोलीस प्रशासनाने ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून बघ्याची भूमिका स्वीकारल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पोलिसांच्या या भूमिकेमुळे डीजे, लाऊड स्पीकरवाल्यांचे चांगलेच फावले आहे.
हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात लाडक्या बाप्पाचे शनिवारी (ता. ७) मोठ्या उत्साहात आगमन झाले. काही सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात झाले. पारंपारिक पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा नागरिकांनी आनंद घेतला. मात्र काही मंडळांच्या गणेशाचे आगमन डीजेच्या तालावर झाले.
पूर्व हवेलीत तब्बल २० ते २५ डीजेवाल्यांनी ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवू अमर्याद आवाज वाढविल्याचे समोर आले आहे. यावेळी डीजेसमोरच कार्यकर्त्यांनी धांगडधिंगा नाच केला. तर या आवाजामुळे नागरिकांना कानठळ्या बसल्या. मात्र पुणे शहर व जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिरवणुका व अन्य उत्सवात डीजे व डॉल्बी सिस्टीमसारख्या वाद्यांवर सरकारने बंदी घातली आहे. ध्वनिप्रदूषण कायदा नियम, 2000 नुसार, शांतता क्षेत्र (रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळ, न्यायालये), निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्र असे चार विभाग केले आहेत. या प्रत्येक विभागात दिवसा व रात्रीच्या वेळी आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे.
दरम्यान, ध्वनि प्रदूषणामुळे नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. ध्वनि प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. ध्वनि प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते. हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनि प्रदूषणामुळे हानी पोहचू शकते.
दणदणाटाला चाप कधी बसणार?
डीजे, लाऊड स्पीकरवाले कर्णकर्कश आवाज वाढवून शासनाचे नियम पायदळी तुडवीत आहेत. ध्वनी प्रदूषणाबरोबर, रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन डीजे, लाऊडस्पीकरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम
70 डेसिबल या मर्यादेपर्यंतचा आवाज आपले कान सहन करू शकतात. 100 डेसिबलच्या वरील मर्यादेचा आवाज सतत कानावर पडत राहिल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. परिणामी, कानाचा पडदा फाटू शकतो. बहिरेपणा येऊ शकतो. या आवाजामुळे कानाची जी नस आपल्या हृदयाला जोडलेली असते ती स्टिम्युलेट होते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.
तक्रार कुठं कराल?
डीजे, बँड वाजविण्याच्या संदर्भात न्यायालयाने आवाजाच्या संदर्भात काही डेसिबलच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्या नियमांचे पालन करूनच त्यांनी डीजे, बँड वाजवावे. मात्र, जर कोणी कर्णकर्कश आवाज वाढवून शासकीय नियमाचे उल्लंघन करत असतील तर नागरिकांनी त्वरित 112 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तुमच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात येईल. तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पुणे शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षेची तरतूद…
पर्यावरण मंत्रालयाने 16 ऑगस्ट 2000 च्या निर्णयानुसार ध्वनिवर्धक वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. ध्वनिक्षेपकासाठी मर्यादा ठरवली आहे. औद्योगिक क्षेत्र (दिवसा 75, रात्री 70 डेसिबल), वाणिज्य क्षेत्र (दिवसा 65, रात्री 55), निवासी क्षेत्र (दिवसा 55, रात्री 45), शांतता झोन (दिवसा 50, रात्री 40) अशी मर्यादा आहे. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.