पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील एका चौकात सात महिन्यांपूर्वी दुचाकी-ट्रकची भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात दुचाकीस्वार गौरव खंडारे गंभीर जखमी झाला होता. त्याच्याबरोबर असलेला सहप्रवासी त्याचा मित्र ट्रकच्या चाकाखाली सापडला. ट्रकचालक अन्सारीने ट्रक न थांबविता तसाच निघून गेला. त्यामुळे ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. इशान सुनील करवडे (वय-३४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, या अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शंभरहुन अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, येरवडा पोलिसांना ट्रक चालकाला सात महिन्यानंतर अटक करण्यात यश आले. मोहंमद अशीम हातीम अन्सारी (वय- ३४, रा. कुन्हार कला, जि. हजारीबाग, झारखंड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर परिसरात २० जानेवारी रोजी ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार गौरव खंडारे गंभीर जखमी झाला होता. गौरवबरोबर असलेला त्याचा मित्र इशान ट्रकच्या चाकाखाली सापडला होता. मात्र, ट्रकचालक अन्सारीने ट्रक थांबविला नाहीतो तसाच पुढे निघून गेला. दरम्यान, ट्रकच्या चाकाखाली इशान चिरडला गेल्यामुले त्याचा जागीच मृत्यू झाला. या आपघतानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता तो तेथून फरार झाला.
अपघातानंतर येरवडा पोलिसांनी तपास सुरू करून पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी अनिल शिंदे यांनी जवळपास शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. ट्रकवरील वाहन क्रमांकाची पाटी चित्रीकरणात दिसली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमालकाचा शोध घेतला. अपघात घडला तेव्हा ट्रकवर अन्सारी चालक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला अटक केली. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.