लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कार, टेम्पो व बसचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (ता. १९) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सुगंधा विनयकुमार आग्रवाल (वय-२७, फेज २, स्टांजा मार्शल पी.जे. हिंजवडी, पुणे) व सौरभ कुमार (नाव, वय, पत्ता पूर्ण माहिती नाही) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर सागर गढ़किशोर तांगडे (रा. विवेकानंद नगर, मेहकर, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगंधा आग्रवाल या त्यांचे मित्र सौरभ कुमार यांच्यासोबत नाशिक येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन केल्यानंतर ते पुण्यात माघारी आले होते. त्यानंतर त्यांनी भाडेतत्वावर आणलेली कार घेऊन कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे देण्यासाठी चालले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची कार लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ आली.
दरम्यान, पंपाकडून एक बस वळून महामार्गावर येत होती. तेव्हा सुगंधा आग्रवाल यांनी ताबडतोब गाडी थांबविली. त्याचवेळी आरोपी सागर तांगडे हा पाठीमागून भरधाव वेगाने टेम्पो घेऊन आला. तांगडे याच्या टेम्पोने आग्रवाल यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. पाठीमागून धडक दिल्याने आग्रवाल यांची कार समोरील बसला जाऊन धडकली. या अपघातात आग्रवाल यांच्या कारचे समोरील बाजूचे व पाठीमागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, या अपघातात सुगंधा आग्रवाल जखमी झाल्या. त्यांना लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूच्या बरगडया फ्रॅक्चर झाल्या आहेत, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. तसेच आग्रवाल यांचे मित्र सौरभकुमार यांना दुखापत झाली आहे.
या प्रकरणी सुगंधा आग्रवाल यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर तांगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.