पुणे : गावठी दारुची वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनावर दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई कोंढवा-कात्रज रोडवर करण्यात आली असून त्यामध्ये ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. भगत गणेश प्रजापती (वय-२४, रा. बगळे मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांचे पथक गुन्हे प्रतिबंध गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज-कोंढवा रोड बायपासने जात असताना पोलीस अंमलदार विनय येवले यांना एका बोलेरो पिकअप गाडी संशयितरित्या जाताना आढळून आली. त्यांनी गाडी थांबून आतील बाजूला चेक केले असता १ लाख ५७ हजार ५०० रुपयांची ४५ प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर अशी एकूण १५७५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी या दारुसह मोबाईल, बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार, तसेच सहायक पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस अंमलदार विनय येवले यांनी केली आहे.