ओतूर : जुन्नर तालुक्यातील खुबी नाकाबंदी दरम्यान दूध वाहतुकीच्या बंदिस्त पिकअप जीपमधून दारूची वाहतूक ओतूर पोलिसांनी पकडली आहे. या कारवाई मध्ये जीपचालक, दारू विकणारे तसेच विकत घेणारे अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीपसह गावठी दारू असा एकूण ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली.
जीपचालक दत्तात्रय शिवाजी काळे (वय-५०, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), दारू विकणारा यशवंत गुना रढे व रमेश पुनाजी कारभळ (दोघेही रा. सावरणे, ता. मुरबाड, जि. ठाणे) तसेच दारू विकत घेणारा सुभाष बाबूराव नवले (रा. पारगाव, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार आरोपिंची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ओतूर पोलिसांनी खुबी गावच्या हद्दीत कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ओतूर येथे २४ तास नाकाबंदी सुरू केली आहे. बुधवारी सकाळी १० वाजता नाकाबंदी चालू असताना कल्याणकडून नगरच्या दिशेला जाणाऱ्या दूध वाहतुकीची बंदिस्त पिकअप जीप (एमएच १४ एचयू ८७६४) पोलिसांना संशयित वाटली. त्यामुळे पोलिस जवान संदीप भोते, सुभाष केदारी व इतर सहकारी यांनी जीपची तपासणी सुरु केली.
दरम्यान, यावेळी जीपमध्ये ट्यूबच्या फुग्यातून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी जीपचालक दत्तात्रय काळे याला ताब्यात घेतले आहे. चालकाने चौकशीत सांगितले कि ही दारू यशवंत रढे व रमेश कारभळ यांच्याकडून घेऊन ती सुभाष नवले यास विकण्यासाठी घेऊन असल्याचे सांगितले. १० हजार रुपयांची दारू, पिकअप जीप असा एकूण ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पोलिस हवालदार बाळशिराम भवारी करीत आहेत.