-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : वेगावर नियंत्रण नसणे हे अपघात वाढीचे प्रमुख कारण आहे. वेगमर्यादेचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांवर पुणे सोलापूर महामार्गावर स्पीडगनच्या माध्यमातून कारवाईसाठी पथकांची नेमणूक केली आहे, अशी माहिती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या इंदापूर महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी पुणे प्राईम न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
महामार्गावरील जीवघेणा वेग नियंत्रणात आणण्यासाठी स्पीड गनची योजना शासनाने केली आहे. प्रवासातील अंतर घटावे, यासाठी नवतंत्राद्वारे विस्तृत अशा महामार्गाची निर्मिती शासनाद्वारे करण्यात येत आहे. बेदरकारपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘स्पीड गन ‘द्वारे महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग मोजला जातो. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरच्या काळात वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करून तयार केलेल्या स्वयंचलित स्पीड गन मशीन इंटरसेप्टर व्हॅनमध्ये बसवलेल्या आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन संबंधित वाहन चालकांकडून केले जात असेल तर या व्हॅनमध्ये असलेली आधुनिक यंत्रणा स्मार्ट कॅमेराद्वारे अचूकरीत्या हेरते.
या व्हॅनमधील स्मार्ट कॅमेरे सुमारे 1 कि.मी. अंतरापर्यंत वाहने सहज आपल्या कॅमेरात टिपू शकतात. ही यंत्रणा अत्याधुनिक असून वाहनांचा वेग अचूक मोजते. डाळज नं 1 (इंदापूर) टॅप मॉर्फत वर्षभरात सातत्याने कारवाई केल्या जात आहे. सदरच्या स्पीड गन मशीन मध्ये चारचाकी वाहनांना 90 किमी प्रति ताशी तर दुचाकी वाहनांसाठी 70 कि.मी प्रतिताशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. निर्धारित वेगमर्यादा, वाहनचालकांना सीट बेल्ट नसणे आणि इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांच्या नावे दंडाचे चलन तयार होऊन वाहनधारकांना ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर एस. एम. एसच्या माध्यमातून दंडाची पावती पाठवली जाते.
हे सर्व दंड नियमानुसार व योग्य पद्धतीनेच केले जातात. त्यामुळे महामार्गावर वेगावर नियंत्रण नसणाऱ्या आणि वेग मर्यादेच्या उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरती नियंत्रण बसण्यास मदत झाली आहे. परिणामी पुणे सोलापूर महामार्गावर ओव्हरस्पीड मुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे, असेही महामार्ग पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी सांगितले.