वाघोली : पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. एकीकडे वाघोलीत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहेत. वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पुणे व लोणीकंद वाहतूक विभाग कंबर कसत आहे. मात्र, दुसरीकडे पुणे महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी होत आहे. केसनंद फाटा ते स्टार बजार मॉलपर्यंत पुणे नगर महामार्गावर असणारे सांडपाणी या कोंडीचे कारण आहे.
या पाण्याने अर्धा रस्ता व्यापला आहे. यामुळे वाहतुकीची एकच लेन येथून चालते. या भागात रस्त्याची रुंदी ही कमी आहे. त्यामुळे खाजगी बस, एस.टी बस, पी.एम.टी व अन्य वाहने रस्त्यावरच प्रवासी घेण्यासाठी थांबतात. तर प्रवासीही सांडपाणी असल्याने अर्ध्या रस्त्यावर येऊन थांबतात.
या पाण्याच्या दुर्गंधीने ही नागरिक त्रस्त आहेत. अनेक वेळा सांगूनही त्यावर कोणताही कारवाई करण्यात आली नाहीये. त्याउलट महापालिका, पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकाकडे बोट दाखवते.
रसत्यावर पाणी येण्याचे कारण?
महामार्गाच्या पावसाळी वाहिनीला काही सोसायट्यांनी सांडपाणी वाहिनी जोडल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होवून महामार्गावर येत आहे. केसनंद फाटा ते स्टार बाजार मॉलपर्यंत हे पाणी साचलेले आहे. केसनंद फाटा भागात या वाहिनीला पुढे वाहिनी जोडण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरू आहे. मात्र, या कामात प्रचंड दिरंगाई सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.