भोर : भोर शहरात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून, तर वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना रहदारीसाठी त्रास होऊ नये याकरिता रस्ते बनवण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांवरून वाहतूक होण्याऐवजी रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पादचारी नागरिक, तसेच शालेय विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांऐवजी शहरातील वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते, तर वाहने रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथवर बेशिस्तपणे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वेळप्रसंगी वाहनचालकांबरोबर नागरिकांचे वाद-विवाद होत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा पायी चालणाऱ्या नागरिकांना दुचाकींचा धक्का लागतो. यामुळे नागरिकांना इजा होण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा वाहनचालकांची रस्त्यातच हुज्जत सुरू असते. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील सर्रास पदपथ वाहनांनी व्यापले गेल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागतो. भोर नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांना येणारे वाहनतळ्याचे स्वरूप याकडे विशेष लक्ष देऊन पादचारी नागरिकांना शहरात बाजारपेठेत ये-जा करताना त्रास होणार नाही, याची दखल घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.