पुणे : सध्या सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी बघायला मिळत आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे तेथील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, या भागातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड, रामवाडी, वनाझ आणि स्वारगेट इत्यादी ठिकाणी जलद व सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.
हर्डीकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची मान्यता देण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे. राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील खडकवासला- स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला मान्यता दिली आहे. या मार्गिकांवर एकूण २८ स्थानके असणार आहेत.
या दोन्ही मार्गिकांसाठी ९८९७.१९ कोटी इतका खर्च लागणार आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर आज केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला गेला आहे. खडकवासला-स्वारगेट- हडपसर-खराडी या मार्गिकची लांबी २५.५१८ किमी असून, या मार्गिकेवर २२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी ८१३१.८१ कोटी इतका खर्च येणार आहे. तसेच टप्पा २ मधील नळ स्टॉप-वारजे माणिकबाग हा मार्ग ६,११८ किमी असून त्यात सहा स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी १७६५.३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे दोन्ही मार्ग संपूर्ण उन्नत असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.