लोणी काळभोर: पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटची वाहतूक करणारा टेम्पो कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौकात शनिवारी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास बंद पडला होता. टेम्पो अचानक बंद पडल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील माल धक्क्यातून एक टेम्पो सिमेंट भरून सोलापूरच्या दिशेकडे निघाला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना टेम्पो अचानक एमआयटी कॉर्नर येथे बंद पडला. अचानक टेम्पो बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. लोणी काळभोर वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी रस्त्यावरील टेम्पो बाजूला करण्यासाठी क्रेनला बोलाविले होते. मात्र तब्बल दोन तास उलटूनही क्रेन आलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांना सोलापूरकडून पुण्याकडे जाण्यासाठी एकच लाईन सोडावी लागली. त्यानंतर वाहतूक कोंडी काही काळाकरता कमी झाली.
दरम्यान, या कालावधीत लोणी काळभोर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस राजेश पवार व आनंद साळुंखे यांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. त्यानंतर क्रेन सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी आले. क्रेनच्या साह्याने टेम्पो बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.