पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वीकेंडमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अशातच सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईच्या लेनवर 40 किमी पॉईंटजवळ एका डिझेल टँकरचा अपघात झाला. यामार्गावरून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. दरम्यान एका वाहनचालकाच्या मदतीला धावणाऱ्या यंत्रमाग तंत्रज्ञाला अज्ञात वाहनाने उडवल्याचा प्रकारही समोर आला.
शुक्रवारी(दि. 18 ) पहाटेपासूनच द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी होत होती. महामार्ग पोलिस, स्थानिक रहिवासी आणि ‘आयआरबी टीम’कडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खंडाळा येथील बोगद्याच्या पुणे दिशेकडील बाजूवर वाहतुकीसाठी तात्पुरता अडथळा निर्माण झाला होता. सकाळपासूनचा हा दुसरा अडथळा आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक थांबवून गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता.
रस्त्यावर अपघात झालेल्या टँकरमधून डिझेल सांडल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी काही काळ मार्ग बंद ठेवण्यात आला. नंतर मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.