पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेली पदयात्रा बुधवारी पुणे शहरात दाखल झाली. या पदयात्रेमुळे नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे पर्यायी मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. नगर रस्त्यासह, येरवडा, बंडगार्डन रस्ता, संचेती पूल, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मराठा आरक्षण पदयात्रा ही बुधवारी पहाटे चारच्या सुमारास नगर रस्त्यावरील खराडी-वाघोली भागात दाखल झाली. या पदयात्रेत हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. पदयात्रेत ट्रक, टेम्पो, जीप अशी वाहने असल्याने वाहनांची रांग आठ ते दहा किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली होती. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर संपूर्ण नगर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता.
नगर रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा पुणे शहरातील मार्ग नगर रस्ता, येरवडा, सादलबाबा चौक, संगमवाडी पूल, संचेती चौक, वेधशाळा चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध असा ठरवण्यात आला होता. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पदयात्रेतील लोक संचेती चौकात दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
नगर रोडवरील वाहतूक बुधवारी सकाळी सातनंतर बंद करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील शासकीय कर्मचारी, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतली. तसेच या परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. वाहनचालकांची गैरसाेय होऊ नये म्हणून जुना मुंढवा पूलमार्गे वाहतूक वळविण्यात आली. टाटा गार्डन, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरीतील अंतर्गत रस्ते सुरू ठेवण्यात आले होते.