योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ते न्हावरे मार्गावरील माळवाडी ओढ्यातील पुलावर जोरदार झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सोमवार (दि.१७) दुपारपासून झालेल्या पावसाने ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबली होती.
दरवर्षी पावसाळ्यात एखादा मोठा पाऊस झाला की या ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. परिणामी वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. प्रवासी व स्थानिक नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरीकांना या पुलावरून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. अन्यथा पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहत बसावे लागते. दरम्यान, पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या या पुलाची उंची वाढवा, नाही तर नवीन मोठा पुल बांधा अशी मागणी संबंधित विभागाकडे नागरिक करत आहेत.