पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड परीसारतील भुसारा बाजारात वस्तू आणि सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करुन एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत महेश तोतामल दर्य़ानी (वय-५२ रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी २९ फेब्रुवारीला मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सहा अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 170, 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मार्कट यार्डमधील भुसार बाजारात व्यापारी पेढीत सहाजण शिरले. जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी फिर्य़ादी यांच्याकडे केली. पेढीतील व्यवहारांची तपासणी करायची असल्याचे सांगून चोरट्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्याला धमकावून गल्ल्यातील वीस हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पळून गेले.
तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी चित्रीकरण तपासण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.