लोणी काळभोर : आजीसोबत झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून १५ वर्षांचा चिमुकला घर सोडून पाषाणवरून चालत निघाला. तो बुधवारी (ता. १४) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तब्बल ३० किलोमीटर अंतर पायी तुडवत कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील चौकात पोहोचला. दिवसभर चालून थकलेला, भूकेने व्याकुळ झालेला हा चिमुकला मदतीच्या अपेक्षेने रस्त्याच्या कडेला उभे राहून हताशपणे पाहत होता. चौकातील रिक्षा चालकाने मुलाची मानसिकता अचूक हेरली अन् समयसुचकता दाखवत चिमुकल्याला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले. रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक होत आहे.
आर्यन सोमनाथ गवळी (वय-१५, रा. पाषाण पुणे) असे रागाने घर सोडून गेलेल्या मुलाचे नाव आहे. तर राजू मोरे असे रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन गवळी हा पाषाण परिसरातील एका शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आर्यनचे बुधवारी (ता. १४) सकाळी किरकोळ कारणावरून त्याच्या आजीसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आर्यन घर सोडून निघाला. आर्यन हा पाषाणमधून दिवसभर चालत कुंजीरवाडी चौकात आला. दिवसभर चालल्यामुळे तो भूकेने व्याकुळ झाला होता. थकलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभे राहून हताशपणे रिक्षावाले राजू मोरे यांच्याकडे एकटक पाहत होता.
दरम्यान, आर्यनने मोठ्या धीराने मोरे यांच्याकडे ‘काका मला एक फोन करायचा आहे, फोन देता का?’ अशी विनंती कली. मोरे यांनी त्याला फोन लावून दिला. त्यानंतर आर्यनचे त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. आर्यनने त्वरित फोन कट केला. मोबाईल मोरे यांच्याकडे दिला आणि स्वतः रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. राजू मोरे हे काम संपवून रिक्षा घेऊन घरी जात असताना, त्या मुलाने केलेल्या फोनवरून परत फोन आला. ‘कृपया त्या मुलाला एकटे सोडू नका. आजीसोबत भांडण झाले म्हणून तो निघून गेला आहे. मुलाला आई नसल्याने त्याला वडिलांची आठवण आली, म्हणून त्याने शेवटचे वडिलांसोबत फोनवरून संभाषण केले.’ असे फोनवरून सांगण्यात आले.
रिक्षाचालक राजू मोरे यांना वास्तव समजताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोरे यांनी रिक्षा पुन्हा माघारी वळवली. रिक्षाचालक मोरे पुन्हा कुंजीरवाडी चौकात आले असता, आर्यन सुदैवाने त्याच ठिकाणी उभा होता. मोरे यांनी त्याला विश्वासाने जवळ घेतले. त्याच्याशी प्रेमाने हितगुज केले. त्यानंतर रिक्षाचालक मोरे यांनी तत्काळ शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. दरम्यान, ते मुलाला घेऊन त्यांच्या घरी गेले.
स्वप्नील कुंजीर यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना फोनद्वारे या घटनेची माहिती दिली व मुलाच्या वडिलांनाही कुंजीर यांनी फोन करुन मुलगा सुखरूप आहे, काळजी करू नका, आपण कुंजीरवाडीत येऊन मुलाला घेऊन जा, असे सांगितले.
दरम्यान, कुंजीरवाडीतील हॉटेल श्रीनाथ येथे मुलाला पालक येईपर्यंत बसविण्यात आले. हॉटेलचे मालक सुनील न्हावले यांनी मुलाला जेवण दिले. मुलाची आजी व नातेवाईक कुंजीरवाडीमध्ये आल्यानंतर सर्वांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी ओळख पटवून मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले. मुलाचे वडील आणि आजीला मुलगा सुखरूप असल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले.
यावेळी रिक्षा चालक राजू मोरे, शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर, उद्योगपती गौरव कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर, युवा सेनेचे काळूराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.