पुणे : खरीप हंगामात तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. तसेच कडधान्यांच्या काढणीच्या वेळी अवकाळीचा फटका बसल्यामुळे देशात तूर आणि मुगाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रमाणेच आयात केलेली तूर ग्राहकांच्या पसंतीस उतरत नसल्यामुळे किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १६० ते २०० रुपयांवर गेले आहेत.
खरीप हंगामातील तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. तुरीला २०२४ साठी केंद्र सरकारकडून ७००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र नव्या तुरीची आवक होताच बाजारातील दर सरासरी ९ ते १० हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत.
तूर पिकला अवकाळीचा फटका
सर्वच कडधान्यांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे देशात तूर आणि मुगाच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच पावसात तूर भिजल्याने तुरीचा दर्जा चांगलाच घसरला आहे. खरेदी केलेली तूरडाळ मिल्समध्ये प्रक्रियेसाठी नेल्यानंतर उताऱ्यात घट होताना दिसत आहे.