Tomato Price Increase : पुणे : दरवेळेस कांदा रडवतो असे आपण एकलं असेल, पण टोमॅटोही रडवू शकतो हे आपण जून ते ऑगस्टपर्यंतच्या काळात पाहिलेल आहे. टोमॅटोच्या दरात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दिलासा मिळाल्यानंतर किरकोळ बाजारात दर पुन्हा ६० रुपये किलोवर गेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण या भाज्यांचे दरही किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वाढलेले आहेत.
नारायणगाव, नाशिक, सातारा, सोलापूरसह राज्याच्या अन्य भागांतील टोमॅटो उत्पादनात घट झाली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तेलंगणातून होणारी आवक बंद झाली आहे. त्यामुळे सध्या नाशिकमधून आवक सुरू आहे. डिसेंबर अखेर दर तेजीत राहील, त्यानंतर रब्बी हंगामातील टोमॅटो बाजारात आल्यानंतर दर आवाक्यात येतील.
टोमॅटो दरातील चढ-उतार
मे ३०
जून ८०-१००
जुलै १८०-२००
ऑगस्ट मध्य १६०-२००
ऑगस्टअखेर ८०-१२०
सप्टेंबर २०-३०
ऑक्टोबर २५-३५
२२ नोव्हेंबर ५० ते ६०
लागवडीत मोठी घट
राज्यात रब्बी हंगामात सरासरी २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड होते. यंदा २० नोव्हेंबपर्यंत १६९० हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली असून, महिन्याअखेर आणखी काही लागवड गृहीत धरली तरी मोठी घट नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात नगरमध्ये ४२१, पुण्यात ३२०, सोलापूर ९४९ आणि साताऱ्यात ५७९ हेक्टरवर लागवड झाली आहे. नाशिक परिसरात खरिपातील लागवड काढल्यानंतर लागवडी सुरू होतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली. रोपवाटिकातील टोमॅटो रोपांच्या मागणीत ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
जून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापर्यंत टोमॅटोचे दर तेजीत राहिल्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात टोमॅटोची चांगली लागवड झाली होती. आता सप्टेंबरपूर्वी झालेल्या लागवडीपासून टोमॅटो मिळणे कमी झाले आहे. बाजारांमध्ये आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे.