गणेश सूळ (केडगाव, ता. दौंड)
Tomato price hike : गेल्या १५ दिवसांत टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे प्रचंड गदारोळ सुरू आहे. सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत. टोमॅटो महाग झाल्याच्या बातम्या, व्यंगचित्रे, मिम, रिल्स यांना ऊत आला आहे. टोमॅटो भाववाढ हा राष्ट्रीय प्रश्न म्हणून चर्चिला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या भाववाढीचे विश्लेषण करत आहे. दुसरीकडे अवघी दीड महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी टोमॅटो भाव नसल्याने फेकून दिले होते. कांद्याला भाव नसतानाच टोमॅटो पीक तारणार, अशी स्वप्ने उराशी बाळगून असलेल्या शेतकऱ्यावर टोमॅटोला भाव मिळत नसल्याने हाताशी आलेले पीक शेतातच उपटून फेकून देण्याची वेळ आली होती. अनेक ठिकाणी शेतात टोमॅटोचा खच पडला होता. त्याची छायाचित्रे कोणी शेयर करून भाववाढीसाठी आंदोलने, निदर्शने केल्याचे ऐकीवात नाही. समाजात आज परस्परविरोधी चित्र दिसत आहे.गणेश सूळ
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रीया
सरकारने नाफेडद्वारे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करून सरकारच्यावतीने ग्राहकांना स्वस्त दरात विकण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले टोमॅटो मातीमोल किमतीत विकावे लागले होते. (Tomato price hike) टोमॅटो तोडण्याचा व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी टोमॅटो अक्षरशः रस्त्याच्या कडेला फेकून देत होते. शेतकरी अडचणीत असताना सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा का झाली नाही. आता मात्र मूठभर शेतकऱ्यांना दोन रुपये मिळू लागताच सरकार लगेच भाव पाडण्यासाठी सक्रिय झाले आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत एकतर्फी व शेतकरीविरोधी आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत १५० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटो महाग झाले असले तरी पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जात असल्याचा सर्वसामान्य ग्राहकांचा समज होता.(Tomato price hike) पण वास्तव तसे दिसत नाही. दीडशे रुपयांना जरी टोमॅटो विकले जात असले तरी उत्पादकांच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. बाकीची रक्कम वितरण प्रणालीच्या गल्ल्यात जमा होत आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
विचार करा, गेल्या नऊ वर्षांत किती वस्तूंचे भाव वाढले? पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस ही महत्त्वाची उदाहरणे आहेत. या तिन्ही बाबी जीवनावश्यक आहेत. यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. या तिन्हींची एवढी मोठी दरवाढ झाली, याविरूद्ध किती आरडाओरडा केला. एकदा तरी कोण रस्त्यावर उतरले का? याचा सरकारला जाब विचारला का? जीएसटीच्या माध्यमातून केंद्रसरकार प्रचंड पिळवणूक करत आहे. त्याविरूद्ध कधी आंदोलन केलयं का? कोणत्या चॅनलने याविरूद्ध मोहीम उघडली? याची उत्तरं नकारार्थी येतील.
शेती करायची म्हणजे अडचणींचा डोंगर असतो. पेरणीपासून, बियाणे खरेदी करणे, नांगरणी, मजूर मिळवणे, ढगांकडे आस लावून पावसाची वाट बघणे, मान्सून कुठपर्यंत आला हे पाहणे, एकदाची पेरणी झाली की पाऊस कधी येईल, या आशेने सतत त्रासात राहणे आणि हे सर्व नीट पार पडलं की हळूहळू सहा महिने होतात आणि ऐन कापणीच्या वेळेस परतीच्या पावसाने उभे पीक जमीनदोस्त होते. तुम्ही विचारही करू शकत नाही, अशावेळी शेतकऱ्याच्या काय भावना असतात? डोक्यावर कर्ज, दुकानदाराची उधारी, काहींच्या मुला-मुलींचे लग्न, घराचे बांधकाम हे सर्व त्या पिकासोबत जमीनदोस्त होत असतं.
आता तर राबणारा शेतकरी सोडून शेती या व्यवसायात सर्वजण श्रीमंत होत आहेत. व्यापारी, वाहतूकदार, खत दुकानदार, पाईप-ठिबक दुकानदार, ट्रॅक्टर विक्रेते, हार्डवेअर दुकानदार, सरकार सर्वच श्रीमंत होत आहेत. पण राबतो कोण तर शेतकरी राजा. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरीच आज ओझ्याखाली दबत आहे. शेतकऱ्याकडे लाखो करोडोंचा भाव असलेल्या जमिनी आहेत. पण विकू शकत नाही. कारण, शेतीला तो आई मानतो आणि जमीन विकली तर इतरांची पोटं कशी भरणार, ही भ्रांत असतेच.
आज शेतकरी वर्गाचे कष्ट जाणण्याची गरज आहे. आज प्राथमिक शेतकऱ्याकडे मुलांना चांगल्या शाळेत घालण्याएवढा पैसा नाही. उन, वारा, पाऊस सोसून राबणारे हात आज अन्नाला महाग झाले आहेत. (Tomato price hike) शेतमालाला बाजारपेठ मिळाली नाही, तर दिवसभर राबून उपाशीपोटी घरी परतल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल याचा फक्त विचार करा. एवढे करूनही व्यापाऱ्यांची मनमानी, उत्पन्नाला कमी भाव, वाढती रोगराई, भाववाढ यांनी शेतकरी खोलात जातच आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का, असा प्रश्न आता संतप्त शेतकरीच विचारू लागले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज; वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार; काय आहे नवी प्रणाली?