पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदारांनी चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर भरलेला नसल्यामुळे वसुली मोहीम तीव्र करण्यात येत आहे. त्यासाठी तीन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची कारवाई लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी कर संकलन विभागाचे बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या विभागाचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले होते. परिणामी, वसुली मंदावली होती.निवडणुकीचे कामकाज संपल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी पुन्हा रूजू झाले आहेत. मंडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वसुली मोहीम तीव्र करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत.
शहरातील पाच लाखांपेक्षा अधिक रूपये थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ३२ इतकी आहे. त्यांच्याकडे तब्बल १४० कोटींची थकबाकी आहे. त्या थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात त्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई तीव्र केली जाणार आहे. तसेच, तीन लाख रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांचीही यादी तयार करण्यात आली आहे. असे थकबाकीदार एकूण १ हजार ६३२ आहेत. त्यांच्याकडे एकूण ६३ कोटी रूपयांची थकबाकी आहे.
या थकबाकीदारांनाही जप्तीपूर्व नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. टेलिकॉलिंगद्वारे मालमत्ताधारकांना मालमत्ताकरांचे बिल भरण्याबाबत सूचीत केले जाणार आहे. तसेच, मोबाईलवर एसएमएस पाठविले जात आहेत. थकबाकीदार तसेच, मालमत्ताधारकांनी मालकत्ताकराचे बिल भरून कारवाई टाळावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.