पुणे : शेतकऱ्यांसाठी पुणे कृषी उत्पन बाजार समिती आर्थिक वैद्यकिय मदत योजना राबविणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्याचे पणन संचालक यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली़ आहे. यावेळी उपसभापती सारिका हरगुडे, संचालक संतोष नांगरे, अनिरुध्द भोसले, शशीकांत गायकवाड, लक्ष्मण केसकर, प्रकाश हरपळे आदी उपस्थित होते.
प्रशांत काळभोर यांना सह्यांचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर संचालकांसह त्यांनी बाजार आवाराची पाहणी केली. यावेळी बोलताना म्हणाले कि, शेती करताना शेतकऱ्यांना तणनाशक व विविध औषधांची फवारणी करावी लागते़. त्यातून काही आजारांना सामोरे जावे लागते़ त्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी यासाठी आर्थिक वैद्यकिय मदत योजना राबविण्यात येणार आहे़.
तसेच पुढे म्हणाले कि, शेतकरी निवासाची दुरावस्था झाली असून शेतकऱ्यांना ते अद्ययावत करण्यात येणार आहे़. तेथे साफसफाई करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत़. बाजारात वाहतुक कोंडीचा त्रास बाजार घटकांना सहन करावा लागत आहे़. त्यासाठी पी1, पी2 ही प्रणाली वापरली जाणार असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे़. बाजार आवारात शौचालयांची अपुरी संख्या असून ती अद्ययावत करण्यात येणार आहे़.
मार्केटयार्डातील रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत़, त्यामुळे पुढील 50 वर्षांचा विचार करुन रस्त्यांची दर्जेदार कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही काळभोर यावेळी म्हणाले़.
बाजारात शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़, पाण्याची बाटली विकत घेवून पाणी प्यावे लागत आहे़. त्यामुळे ठिकठिकाणी आऱओ़ प्लांट बसविण्यात येणार आहेत़. तसेच बाजार चांगला दिसावा यासाठी एकाच रंगात सर्व गाळ्यांची नावे दिसतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़.
लिंबू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बाजारातील किरकोळ लिंबू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़. लिंबू विक्री ही गाळ्यांच्या समोरच होवू लागली आहे़. ती होवू नये यासाठी सिक्युरिटी नेमली आहे़. लिंबू विक्रेत्यांना विशिष्ट जागा दिली आहे़, मात्र त्या ठिकाणी विक्री न करता गाळ्यांच्या समोर विक्री होत आहे़. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी लिंबू विक्रत्यांबरोबर बैठक घेण्यात येणार असून या बैठकीस तोडगा न निघाल्यास किरकोळ लिंबू विक्री हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशांत काळभोर यांनी सांगितले़.