पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहेरुन पैसे आणले नाहीत, या कारणावरुन सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी संतनगरमधील विठ्ठल निवास येथे घडली आहे. नयना प्रकाश माघाडे (वय-२६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी विवाहितेचा भाऊ जय खरात (वय-२८, रा. निंबगाव जाळी ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश माघाडे (वय-३२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण नयना हिचा प्रकाश माघाडे याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर वेळोवेळी माहेरुन पैसे आणले नाहीत, या कारणावरुन तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रकाश तिला मारहाण करत असे. नयनाचा शारीरीक व मानसिक छळ करीत असे. तिला माहेरी सोडून तू तिकडेच रहा, परत माझ्या घरी येऊ नको, मला तुला नांदवायचे नाही, अशी वेळोवेळी तिला धमकी देत असे.
दरम्यान, सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले आहे. नयना हिने शुक्रवारी बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.