पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दिलेल्या त्रासामुळे कंटाळून एका महिलेने स्वयंपाकघरातील चाकूने स्वत:ला भोसकून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा उर्फ सोनल विकी कांबळे (वय-३३, रा. बोलाईखाना, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना २२ जुलै रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरात घडली आहे.
या प्रकरणी पूजाची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर सोनवणे (वय-५४, रा. गोपी मेडिकलजवळ, मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून विकी शंकर कांबळे (वय-३८) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो सतत पूजाला शिवीगाळ करुन मारहाण करायचा. २२ जुलै रोजी साडेदहा वाजण्याचा सुमारास विकीचे आणि पूजाचे भांडण झाले होते, त्यामुळे त्याने शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यानंतर पूजाने स्वयंपाकघरात जाऊन स्वत:वर चाकूने वार केले.
दरम्यान, चाकू भोसकून घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. तिला रक्तभंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, तिच्यावर उपचार सुरु असतानाच, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पतीने दिलेल्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.