पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याच्या छेडछाडीला कंटाळून आणि मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. रेणुका बालाजी साळुंके (वय १९, मूळ रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
ही घटना पुण्यातील प्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ७ मार्च रोजी घडला आहे. या प्रकरणी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान सिद्धू या दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेणुका ही भारती विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. ती जात असलेल्या खाणावळीत काम करणाऱ्या सतीश जाधव या व्यक्तीने तिला मोबाइलवर ‘आय लव्ह यू’ असा संदेश पाठविला होता. त्यानंतर येता जाता तो तिला विचारणा करून त्रास देत होता. या त्रासामुळे रेणुका खूप घाबरून गेली होती.
तसेच रेणुका ही होस्टेलच्या खोलीत अभ्यास करत असताना रूममेट मुस्कान सिद्धू ही वीज बंद करत असे. मुस्कान ही देखील रेणुकाला अभ्यास करू देत नसायची आणि जाणून बुजून त्रास द्यायची. त्यामुळेही ती त्रासलेली होती. या जाचाला कंटाळून रेणुकाने ७ मार्चला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये पेटवून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हापासून तिच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र या घटनेत तिचं शरीर जास्त भाजलं होतं. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिचा उपचारादरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला. सहायक निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.