पुणे: जवाहर नवोदय विद्यालयांमधील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशानिमित्त आयोजित ‘लेटरल’ प्रवेश निवड चाचणीसाठी (लेस्ट २०२५) उमेदवार आता १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला cbseitms.nic.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन नवोदय विद्यालय समितीने केले आहे.
नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत सूचनेनुसार, जवाहर नवोदय विद्यालयात नववी आणि अकरावीच्या रिक्त जागांसाठी निवड चाचणीद्वारे ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. लेस्ट २०२५ साठी नोंदणी केल्यानंतर उमेदवाराला अर्जामध्ये काही सुधारणा करायची असल्यास त्यासाठी एक दुरुस्ती विंडो उघडली जाईल. ही विंडो नोंदणीच्या शेवटच्या तारखेपासून दोन दिवसांपर्यंत उपलब्ध असेल. या कालावधीत उमेदवारांना लिंग, श्रेणी (सामान्य, ओबीसी, एससी, एसटी), क्षेत्र (ग्रामीण किंवा शहरी), अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम यासारख्या तपशीलांमध्ये सुधारणा करण्याची परवानगी असेल. ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल.
नववीच्या वर्गासाठी निकष
उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करत असलेल्या जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने शैक्षणिक सत्र २०२४-२५ दरम्यान जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवी शिकलेला असणे आवश्यक आहे. १ मे २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान जन्मलेले उमेदवार वर्ग नऊसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र असतील आणि नवोदय विद्यालय जेथे आहे, त्याच जिल्ह्यात इयत्ता आठवी शिकणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज घेतले जातील.