पुणे : पुण्यात वाघांच्या शिकरीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये वाघांची शिकार करून कातडी विकणार मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. पुणे सीमा शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली असून या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.
वाघाची कातडी विकणारा एक ग्रुप जळगाव जवळ आल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली होती. त्याचा तपास करण्यासाठी 26 तारखेला पुण्यातून पथक निघालं. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत सीमा शुल्क विभागाने सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश असून रहीम रफिक हा टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे.
गाईला विष देऊन दिलं वाघाच्या तोंडी
या तस्करांनी एका वनगाईला विष देऊन ठार मारलं आणि ती गाय वाघाच्या तोंडी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ती गाय वाघाने खाल्ल्याने वाघाचा त्यामध्ये मृत्यू झाल्याचं तपासातून समोर आलं आहे.
वाघीणीचे कातडे जप्त..
ताब्यात घेण्यात आलेली कातडी ही पाच फूट लांब असणाऱ्या वाघीणीची असल्याचे उघड झाले आहे. ही वाघीण चार ते पाच वर्षांची असल्याचं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी असल्याचं सांगितलं जातंय. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणी Wildlife (Protection) Act, 1972 कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
शिकारींशी आंतरराष्ट्रीय संबंध?
अटक करण्यात आलेल्यांपैकी रहीम खानची चौकशी केल्यानंतर त्याला यापूर्वी देखील फॉरेस्ट डिपार्टमेंटने अटक केली होती अशी माहिती समोर आली. तर मोहम्मद आशर खान हा भोपाळचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जळगावात सापडलेल्या या प्रकरणाता भोपाळ आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संबंध आहे का? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पुणे सीमा शुल्क या प्रकरणी अधिकचा तपास करत असून यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत का? कोणतं रॅकेट कार्यरत आहे याचा तपास सुरु आहे.