लोणी (पुणे): पुणे जिल्ह्यातील लोणी रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटर वारंवार बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. १६ मे रोजी शुक्रवारी तिकीट काउंटर बंद असल्याने प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास करावा लागला. नागरिकांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तिकीट काउंटर वारंवार बंद असण्याबाबत विचारणा केली असता, प्रवाशांना सांगण्यात आले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार संपल्यामुळे ते कामावर आले नसल्याचे उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. तिकीट काउंटर बंद केल्याने प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

लोणी रेल्वे स्थानक हे लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी आणि थेऊर यासह आसपासच्या गावांतील प्रवाशांसाठी एक प्रमुख स्थानक आहे. अनेक प्रवासी कामासाठी पुणे आणि दौंड येथे जातात आणि या स्थानकावर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. लोणी स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या दौंड -पुणे -दौंड, पुणे -दौंड-बारामती-डेमू तर पुणे -सोलापूर पॅसेंजर ट्रेनसह अनेक गाड्या लोणी स्थानकावरून धावतात. तथापि, तिकीट काउंटर वारंवार बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून तिकिटाशिवाय प्रवास केल्याबद्दल दंड भरावा लागत आहे.
प्रवाशांनी गर्दीच्या वेळी तिकीट काउंटर बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी विनंतीही प्रवाशांनी केली आहे.
प्रवाशांनी ही बाब लोणी रेल्वे स्थानकाचे प्रबंधक अजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी तातडीने वाणिज्य विभागाचा एक कर्मचारी स्टेशनवर पाठवला. सकाळी ९:३० वाजता तिकीट काउंटर पुन्हा सुरू करण्यात आले. तथापि, बंद तिकीट काउंटरमुळे तिकीट काउंटरमुळे सकाळी साडेचार ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान डेमू, सोलापूर पॅसेंजर, बारामती डेमू, अशा एकूण 7 गाड्या विनातिकीट गेल्या असल्याची माहिती काही प्रवाश्यांनी दिली.







