गणेश सुळ
केडगाव : केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ सोमवारी दौंड तालुक्यातील देलवडी, एकेरीवाडी येथे झाला. या दोन्ही ठिकाणी विविध शिबिरे आयोजित करून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला. या वेळी तब्बल २०० हून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला.
एकेरीवाडी व देलवडी या दोन्ही ठिकाणी दोन सत्रांत सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते ८ या वेळेत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये पंतप्रधान पथ विक्रेता, आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृत योजना आदी विविध योजनांचा समावेश आहे.
या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये केंद्राच्या सरकारी योजनांबरोबरच पीएम स्वनिधी नोंदणी कॅम्प, आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी तसेच आधार कार्ड दुरुस्ती (अपडेशन) शिबिर आयोजित केले होते.
या भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या वेळी आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी विभाग अशा विविध विभागांतील शासकीय अधिकारी, देलवडी व एकेरीवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका, अगंणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.