पुणे : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. बहिणीच्या प्रियकरावरील रागातून एका अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराने चक्क स्कूल व्हॅन चालक तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना वाघोली येथे घडली. विशेष म्हणजे हल्ला झाला तेव्हा तरुण मुलांना स्कूल व्हॅनमधून घेऊन जात होता. व्हॅनमध्ये शाळेची मुले असताना देखील हल्लेखोरांनी गाडीच्या काचांवर आणि दरवाजावर कोयत्याने घाव घालत हल्ला चढवला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे घाबरलेल्या मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. विद्यार्थ्यांचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, त्यामुळे सुदैवाने या घटनेत शाळेचे विद्यार्थी बचावले.
या प्रकरणी सचिन दिगंबर इंगवले (वय २७, गल्ली नंबर ०३, काळबाईनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे त्यांची आई, पत्नी, लहान भाऊ आणि मुलासह राहण्यास आहेत. त्यांच्याकडे स्कूल व्हॅन असून ते वाघोली येथील बीजेएस कॉलेज या संस्थेच्या शाळेतील मुलांना शाळेत नेण्या-आणण्याचे काम करतात. त्यांच्या गाडीवर सहा वर्षांपूर्वी फिर्यादीच्या आत्याचा मुलगा मोहन राजाभाऊ कदम (रा. शिरसाळा, ता. परळी, बीड) हा चालक म्हणून काम करीत होता. तो वाघोलीमधील दुबेनगर येथील एका मुलीला आणि तिच्या भावाला २०१९-२०२० मध्ये बीजेएस कॉलेज या संस्थेच्या शाळेत ने-आण करण्याचे काम करीत होता. त्यावेळी मोहन व त्या मुलीमध्ये प्रेमप्रकरणावरून वाद झाले. त्यानंतर पिडीत मुलीने मोहन विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या गुन्ह्यात अटक झालेल्या मोहनला जामीन मिळाला असून तो कारागृहाबाहेर आला आहे. फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात मोहन याच्यासोबत फिर्यादी न्यायालयात तारखेसाठी शिवाजीनगर न्यायालयात गेले होते. त्याच दिवशी पिडीत मुलगी ही सुद्धा न्यायालयात आली होती. न्यायालयातील कामकाज संपल्यावर फिर्यादी इंगवले, मोहनला घेऊन शनिवारवाडा पाहायला गेले होते. त्यावेळी पिडीत मुलगी देखील त्यांच्यासोबत शनिवारवाडा पाहायला आली होती. तिने तिच्या मोबाईलमध्ये मोहन आणि फिर्यादी यांच्यासह सेल्फी फोटो घेतला होता.
दरम्यान, मुलीच्या भावाने हा फोटो मोबाईलमध्ये पाहिला. त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हा फोटो त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवला. २३ फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन आले. पिडीत मुलीच्या भावाने त्यांना ‘मी पाठविलेला फोटो बघ. तु असा फोटो काढलाच कसा? तुझी माझे बहिणीबरोबर फोटो काढण्याची हिम्मत कशी झाली? तुला आता जिवंत सोडणार नाही.’ अशी धमकी दिली. याबाबत इंगवले यांनी त्यांच्या आईला या घटनेबाबत सांगितले होते. त्यावेळी त्यांच्या आईने पिडीत मुलीच्या वडिलांना या प्रकरणाशी आमचा संबंध नसून मुलाला समजावून सांगा असे सांगितले होते.
दरम्यान, सोमवारी, (४ मार्च) रोजी सकाळी साडेनऊ वाजता फिर्यादी इंगवले नेहमीप्रमाणे स्कूल व्हॅन घेऊन बीजेएस शाळेमध्ये सकाळी सोडलेली मुले घेऊन परत घरी सोडण्यासाठी जात होते. बीजेएस कॉलेजच्या गेट नंबर दोनजवळ आल्यावर आरोपी मुलगा त्याच्या साथीदारासह व्हॅनकडे चालत याला. त्या दोघांच्या हातामध्ये लोखंडी कोयते होते. शाळा सुटल्यामुळे रस्यावर मोठी गर्दी होती. फिर्यादी इंगवले त्यांची व्हॅन सावकाश चालवत निघालेले होते. तेव्हा हे दोघे गाडीला पुढील बाजूने आडवे आले. या दोघांनी मिळून त्यांच्या गाडीच्या पुढील बाजूच्या काचेवर कोयत्याने घाव घालायला सुरुवात केली. चालक बाजूच्या उजव्या हाताच्या काचेवर देखील कोयत्याने जोरजोरात घाव घालून ही काच देखील फोडली. या हल्ल्यामुळे फिर्यादी प्रचंड घाबरले होते. ते खाली वाकून बसलेले असतानाच दुसऱ्या आरोपीने त्यांना गचांडीला धरून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत फिर्यादीच्या हाताला दुखापत झाली. त्यांचा शर्ट देखील फाटला. तसेच गाडीच्या फूटलेल्या काचा व्हॅनमध्ये असलेल्या मुलांना लागल्या. त्यामध्ये मुलांना किरकोळ दुखापत झाली.
अचानक घडलेला हा प्रकार पाहून गाडीमधील भेदरलेल्या मुलांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी आरोपीने हातातला कोयता वर करुन, ‘तु आज माझ्या हातून वाचला आहेस. परत मला या रस्त्याने दिसला, तर तुला जिवंत सोडणार नाही.’ अशी धमकी दिली. मुलांचा आरडाओरडा ऐकून रस्त्याने येणारे जाणाऱ्या लोकांनी फिर्यादीला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघे आरोपी तेथून पळून गेले. त्यानंतर फिर्यादी हे लोणीकंद पोलीस ठाण्यात गेले.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास करे म्हणाले, की तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर असल्याने त्याचा तात्काळ तपास सुरू करण्यात आला असून अल्पवयीन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.