पाटस : सध्या पाटस ते दौंड हा रस्ता अपघाताच रस्ता म्हणून प्रसिध्द झाला आहे. पाटस हद्दीतील जुनी कडा वसाहत जवळ मालवाहतूक ट्रक, पिकअप जीप तसेच चारचाकी गाडी या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघाताच्या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली, मात्र अपघातामुळे त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अर्धा पाऊण तास रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
पाटस ते सिद्धटेक या अष्टविनायक रस्त्यावर पाटस ते दौंड हद्दीत मागील दोन महिन्यापासून रोज कुठे ना कुठे अपघातांच्या घटना घडत आहेत. एका महिनाभरात दोन जणांना आपला जीव अपघातात गमवावा लागला आहे. पाटस हद्दीतील अंबिकानगर परिसरात एका घरात भरधाव वेगाने मालवाहतूक करणारा कंटेनर घरात घुसला होता. अपघातात घरातील दहा जण थोडक्यात बचावल्याची घटना पाच दिवसांपूर्वीच घडली होती.
ही घटना ताजी असतानाच सोमवारी (दि.26) सायंकाळी सहा वाजण्याच्या आसपास पाटस हद्दीत जुनी कडा वसाहत जवळ वळणावर दौंड बाजुंकडून भरधाव वेगाने पाटस कडे येणाऱ्या पिकअप जीप ने समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकला धडक दिली. तसाच पुढे ट्रकच्या पाठीमागून आलेल्या चार चाकी गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे इंजिन मधील ऑइल गळती झाल्याने रस्त्यावर ऑइल मोठ्या प्रमाणात पडले गेल्याने दुचाकी चालकांच्या गाड्या घसरत होत्या.
या विचित्र अशा अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अष्टविनायक रस्त्यावर वाहतूक पोलिसांची कमतरता भासू लागली आहे. रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्याने व ते वेळेवर न आल्याने तब्बल पाऊण तास या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.