पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यास नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला असून जवळपास सव्वा तीन हजार अर्ज अनामत रकमेसह यंत्रणेकडे आले आहेत. पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहे.
यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ३ हजार २७१ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.