पुणे : आरोपी पलायन प्रकरणी येरवडा पोलिस पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांना पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबीत केले आहे. सुशांत राजेंद्र भोसले, विठ्ठल बप्पाजी घुले आणि सुरज हिराचंद ओंबासे अशी त्यांची नावे आहेत. २१ ऑक्टोबर रोजी मोक्कातील आरोपी निखील मधुकर कांबळे (वय.२८, रा. लक्ष्मीनगर येरवडा) याने त्रास होत असल्याचे सांगून पाणी मागण्याच्या बहाण्याने गाडी थांबवल्यानंतर रात्री पावणे दहा वाजता गुंजन चौकातून, डाव्या हातातील बेडीतून अलगद हात काढून पळ काढला होता.
दरम्यान, हा प्रकार पोलिस दलाच्या नियमांचे उल्लंघन करणारा, अशोभनीय, बेशिस्त आणि बेजबाबदारपणाचा आहे. तिघांनी केलेल्या कसूरीमुळे वर्तणूक नियमांतील तरतुदींचा भंग होऊन पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवत तिघांना निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन कालावधीत तिघांनी दररोज राखीव पोलिस निरीक्षक मुख्यालय येथे हजेरी द्यावी, असे देखील आदेशात म्हटले आहे.
कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यासह साथीदारांवर काही महिन्यांपूर्वीच येरवडा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. २५ ऑगस्टपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. १७ ऑक्टोंबर रोजी त्याला एका गुन्ह्याच्या तपासासाठी कारागृहातून येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच तो पोटात दुखत असल्याचे सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी सायंकाळी त्याला ससून रुग्णालय येथे मेडिकलसाठी नेले. त्यावेळी गाडीमध्ये एकूण तीन आरोपी होते. तर, चालकासह तिघे कर्मचारी होते. रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांची गाडी गुंजन चौकात आल्यानंतर आरोपी कांबळे याने उलटी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौकात एका ठिकाणी गाडी थांबविली. पाठीमागचा दरवाजा उघडताच आरोपी कांबळे याने काही कळायच्या आत धूम ठोकली होती.