पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अदिकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल दीड महिन्यापासून रेकी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून वनराजची हत्या करण्यात आली होती. दीड महिन्यापासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता.
वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, जयंत कोमकर यांनी कट रचला होता. सोमनाथ गायकवाडने अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती. रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखण्यात आला होता.
रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. अनिकेत दुधभातेने इतर आरोपींची जुळवाजुळव केली. त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला. तेथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच कोयत्याने वार केला. हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्याने पळून जायचे, याचीदेखील आरोपींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळून गेले. या हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे