लोणी काळभोर : मागील एक महिन्याच्या कालावधीत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाणी केल्याच्या 3 हून अधिक घटना घडल्या आहेत. अशातच आता विद्यार्थ्यांच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या इस्ट हेवन सोसायटीजवळ सोमवारी (ता. 13) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे एमआयटी हे एक शैक्षणिक संकुल आहे. या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. तर काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात राहतात. तर काही विद्यार्थी एमआयटीने संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्वावरील घेतलेल्या वस्तीगृहात राहतात. तर काही विद्यार्थी स्वत: फ्लॅट घेऊन मित्रांसोबत भाडेतत्वावर राहतात.
एमआयटी कॉर्नर परिसरातील होस्टेलमध्ये शेकडो विद्यार्थी राहतात. या ठिकाणी शाळा, बँक, हॉटेल व विविध दुकाने आहेत. या परिसरात क्रीओंन प्री प्रायमरी स्कूल देखील आहे. या स्कूलची शाळा दररोज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुटते. मुलांना घरी नेण्यासाठी त्यांचे पालक येत असतात. सोमवारी (ता.13) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळा सुटली. तेव्हा शाळेच्या जवळ असलेल्या इस्ट हेवन सोसायटीसमोर विद्यार्थ्यांमध्ये दगडासह लाठी काठीने मारहाण सुरु झाली.
View this post on Instagram
या घटनेत एकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तर दोन विद्यार्थी पळून जाण्यास यशस्वी ठरल्याने बचावले आहेत. या मारहाणीत क्रेयॉन्स प्री स्कूल मध्ये पाल्याला नेण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आजोबाच्या पोटात दगड लागला आहे. तर शाळेच्या शिक्षकांनी समयसूचकता दाखविल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतले. शाळेचे गेट बंद केल्यामुळे सुदैवाने या मारहाणीत लहान विद्यार्थी बचावले आहेत.
दरम्यान, एमआयटी कॉर्नर परिसरात विद्यार्थ्यांची काही वस्तीगृहे आहेत. या ठिकाणी मागील एक महिन्याच्या कालावधीत वारंवार भांडणे व हाणामारी होत आहेत. ही भांडणे बहुतांशी विद्यार्थ्यांमध्ये अथवा फ्लॅट मालकांसोबत किरकोळ कारणावरून होत असतात. मात्र, भांडणे लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्रांना टोळक्याने बोलाविले जाते. त्यानंतर समोरच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात येते. या वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन काय व कोणावर कारवाई करणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एमआयटी कॉर्नरजवळ भांडणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना समज देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुलातही समुपदेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जर हे करूनही विद्यार्थी कायदा व सुव्यवस्था हाती घेत असतील. तर त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल.
राजेंद्र करणकोट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)