लोणी काळभोर : लोणी काळभोरसह जिल्ह्यात दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या तीन चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने आळंदी (पुणे) येथून अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून सुमारे साडे ६ ;लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर १४ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. शुभम अशोकराव लोंढे (वय २१), सचिन समाधान दळवी (वय २३) व यश शिवाजी भोसले ( तिघेही रा. खंडोबा मंदीराजवळ, आळंदी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथक आळंदी परिसरात गस्त घालत होते. गस्त घालत असताना पथकातील पोलीस अंमलदार अमर कदम व गणेश कोकणे यांना चोरीची दुचाकी घेऊन शुभम लोंढे आणि सचिन दळवी हे दोघे आळंदी येथील आनंदी बस स्टॉपवर येणार आहेत, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली.
दरम्यान, दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी आळंदी येथील चोरीचा गुन्हा त्यांचा साथीदार यश भोसले यांच्या सहाय्याने केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांचा तिसरा साथीदार यश भोसले यालाही अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ६ लाख ६५ हजार रुपयांच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. तर आरोपींकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे , आळंदी ४, आळेफाटा १, वाळूंज १ , म्हाळुंगे १, चिखली १ , शिक्रापूर २ व संगमनेर पोलीस ठाण्यातील १ अशा १४ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
ही कामगिरी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, अमर कदम व समीर रासकर यांच्या पथकाने केली आहे.