नारायणगाव : नारायणगाव येथे बेकादेशीररीत्या सुरू असलेल्या महादेव बुक व लोटस ३६५ या ऑनलाइन सट्टा प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील शहागड येथून जेरबंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहायक पोलीस अधिकारी महादेव शेलार यांनी दिली. दरम्यान, या मुख्य आरोपीना २० मे रोजी जुन्नर येथील न्यायालयात हजर केले असता दि. २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घोट्याळ्यातील मुख्य सूत्रधार राज ललित बोकरिया (वय २९, रा. शांतिनगर, जुन्नर), ऋत्विक सुरेश कोठारी (वय २४, रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) मोहम्मद सलमान पठाण (वय ३२, रा. नंदनवन सोसायटी, नारायणगाव) यांना मध्य प्रदेश येथून अटक करण्यात आली.
या घटनेत एकूण ९९. आरोपी निष्पन्न झाले असून, या गुन्ह्यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापूर्वी ८८ आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे. ८८ जणांपैकी १३ जणांना पुढील चौकशीसाठी पुन्हा येरवडा येथून ताब्यात घेण्यात येणार आहे.