पिंपरी-चिंचवड : क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार २ फेब्रुवारीला उघड झाल्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत ५ पीडितांनी पुढे येत फिर्याद नोंदविली आहे. नौशाद शेखला निवासी शाळेत चाळे करताना पाहिलेल्या काही विद्यार्थिनींनी जवाब दिले आहेत. तसेच अन्य काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे साक्ष नोंदविली आहे. त्यामुळे नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
याप्रकरणी आणखी तीन विद्यार्थिनींनी अत्याचार झाल्याची फिर्याद दिल्यानंतर नौशाद शेखवर आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. सबळ पुराव्यांच्या आधारे नराधम नौशादला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पावले टाकली जात आहेत. अन्य विद्यार्थिनींसोबत असे काही प्रकार घडल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी ही निवासी शाळा चालवतो. २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन लाख २६ हजार रुपये मोजले होते. मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नौशाद शेख राहायचा. पीडित मुलगी १४ वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले. २०२२ मध्ये फ्लॅटवर बोलवून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शेख याला प्रतिकार केला. त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली होती.
दरम्यान, नौशाद शेख विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या आहेत. त्याची क्रिएटिव्ह अकॅडमी अर्थात निवासी शाळेवर आम्ही बुलडोझर चालवू असा इशाराच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिला. भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. नौशाद शेखने २०१४ साली असेच कृत्य केले होते. तेव्हाच त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती. त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचे धाडस वाढत चालले आहे. त्याचे वकीलपत्र कोणीच घेऊ नये, असे आवाहन खापरे यांनी केले आहे.