चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे येथील मराठा हॉटेलमध्ये घुसलेल्या तिघांनी हॉटेलच्या मालकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. १८) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे असे गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत शिंदे थोडक्यात बचावले. या प्रकरणी राहुल पवार आणि अजय गायकवाड यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजय गायकवाड याला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस उप आयुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल शिंदे यांचे चाकण परिसरामध्ये हॉटेल आहे. ते हॉटेलमध्ये असताना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये दोन राउंड फायर केले. यामध्ये स्वप्निल शिंदे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्वप्निल शिंदे आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
आरोपी राहुल पवारच्या भावाची चार महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात स्वप्नीलने मदत केल्याच्या संशयावरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. स्वप्नीलच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यात तो किरकोळ जखमी झाला. स्वप्नील हा देखील सराईत गुन्हेगार आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळतात चाकण पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी अजय गायकवाड याला अटक केली आहे. तर अन्य दोघांच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.