पुणे : स्वारगेट बस स्थानकात चोरटे उदंड झाल्याचे चित्र आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि एका तरुणाचा ऐवज असलेली बॅग असा ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्वारगेट बस स्थानकात उभी असलेल्या मुंबई ते पुणे शिवनेरी बसमधील एका तरुणाची बॅग चोरट्याने चोरी केली. त्यामध्ये लॅपटॉप, आयपॅड, डेबीट कार्ड असा २ लाख ९५ हजार रुपये किमतीचे ऐवज होता. याप्रकरणी, रंजीत लक्ष्मण भानवसे (वय ३६, कडनगर, उंड्री, ता. हवेली) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तरुणाने प्रवासादरम्यान त्याची बॅग एसटीच्या रॅकवर ठेवली होती. मात्र, स्वारगेट स्थानकात आल्यानंतर ती मिळून आली नाही. तर वाकडेवाडी येथील निखील सयाजी देशमुख (वय. २१) या तरुणाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन स्वारगेट बसस्थानकात सांगलीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने चोरी केली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वारगेट पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.