चिखली: घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत कपाटातून तब्बल 3 लाख 40 हजार रुपयांचे सोने चोरी करणाऱ्याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सहा या कालावधीत चिखलीच्या कुदळवाडी परिसरात घडली होती.
या घटनेवरून चिखली पोलीस ठाण्यात समीउनिस्सा मोहम्मद फिरोज खान (वय 25 रा. चिखली) यांनी फिर्याद दिली. खान यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी तपास करत आरोपी प्रेमचंद प्रल्हाद यादव (वय 27.रा निगडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींच्या घराचा दरवाजा उघडा पाहून घरामध्ये प्रवेश केला. त्याने बेडरूममधील कपाटाची तिजोरी फोडून त्यातून 68 ग्रॅम वजनाचे 3 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.