सागर जगदाळे
भिगवण : स्वामी चिंचोली हद्दीतील दत्तकलेजवळ सकाळी सेलेरो कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका नववधूचाही समावेश आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीवरून, पुण्यात कामानिमित्त स्थायिक असणारे मस्के कुटुंबीय पुण्यावरून सोलापूरला आजारी आजीला भेटण्यासाठी सेलेरो (एम एच १२, एल जे ६०५४) या कारमधून निघाले होते. त्यांची कार स्वामी चिंचोली गावच्या हद्दीतील दत्तकलेजवळ आली असता, सोलापूरकडे निघालेल्या मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बुबासाहेब धेंडे, सासरा राजू मस्के, नववधू राधा मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर राधा मस्के हिचा पती अजय मस्के, काजल मस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. राधा व अजय यांचा मागील महिन्यातच विवाह झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच ‘आपुलकीची सेवा’ ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तिन्ही मृतदेह हे भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले, तर जखमींना भिगवण आयसीयु हॉस्पिटल याठिकाणी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी भिगवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व रस्ते महामार्ग पोलीस तातडीने पोहोचले आणि पुढील कार्यवाही चालू केली.