अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : रस्ता आमच्या खाजगी मालकीचा आहे, येथून जायचे नाही. तसेच आमच्या विरोधात केलेली केस माघारी घेतली नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देत तिघांना उसाने व दगडाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील लोखंडे वस्ती येथे २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी दशरथ शितोळे (वय-30 वर्षे, रा. रांजणगाव सांडस, लोखंडे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरून प्रशांत सुरेश रणदिवे, सुरेश चंदर रणदिवे, अनिल उर्फ बाबु सुरेश रणदिवे (सर्व रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस गावच्या हद्दीत जमीन गट १०५ मधील रस्त्यावरून फिर्यादी व त्यांचे चुलते बाळासाहेब व चुलत भाऊ तानाजी हे जात होते. त्यावेळी आरोपी प्रशांत, सुरेश, अनिल उर्फ बाबु यांनी या रस्त्याने जायचे नाही, हा रस्ता आमच्या खाजगी मालकीचा आहे, अशी धमकी देत उसाने फिर्यादी व त्यांचा चुलतभाउ तानाजी यांना बेदम मारहाण केली.
तसेच तानाजी यांना प्रशांत रणदिवे यांने दगड फेकुण मारून तुम्ही आमचेविरूद्ध केलेले केस माघारी घे नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन निघुन गेले. दरम्यान, संभाजी शितोळे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.