लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) येथील अर्कलाईन लॉजिस्टीक्स अॅण्ड वेअर हौसिंग प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊन मधुन लिनोवो कंपनीच्या लॅपटॉपची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) घडली होती. वाघोली पोलिसांनी सदर गुन्हा अवघ्या तीन दिवसाच्या आत उघडकीस आणून तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. वाघोली पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुरेश महादेव कुमार (वय ३५, रा. सध्या रा. उबाळेनगर वाघोली, पुणे. मुळ रा. ग्राम सहजपुर, कल्याण ऊर्फ निवाधा, तहसिल सुराव, थाना होलगड, राज्य उत्तरप्रदेश), शिवाजी जगन्नाथ वसु (वय २७, रा. गट नं. ४६, धानेगाव, ता. गंगापुर, जि. संभाजीनगर) व कुमुद रंजन झा (वय ३२, रा. प्रियंकानगर वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चोरट्यांकडुन २४४ लॅपटॉप व २ पिकअप व्हॅन व ३ मोबाईल असा एकुण १ कोटी १ लाख २५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्कलाईन लॉजिस्टीक्स अॅण्ड वेअर हौसिंग प्रा.लि. गोडाऊन मधुन लिनोवो कंपनीच्या २८० लॅपटॉपची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ),३०६,३३१ (२) (३) (४), ३३४,३१७ (२).३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी एक पथक तयार करून पथकाला गुन्हा उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार अजित फरांदे व अमोल ढोणे यांना तांत्रिक विश्लेषनाद्वारे चोरटे हे वाळुंज एमआयडीसी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली.
आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणावरुन एकुण ९ लोकांकडुन लिनेव्हो कपंनीचे २४४ लॅपटॉप, २ पिकअप व्हॅन व ३ मोबाईल असा एकुण १ कोटी १ लाख २५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल वाघोली पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परि.४ हिम्मत जाधव, येरवडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, पोलीस अंमलदार अजित फरांदे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, संदीप तिकोणे, विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडु, गणेश आव्हाळे, दिपक कोकरे, प्रितम वाघ, गहिनिनाथ बोयणे यांच्या पथकाने केली आहे.